पावलांचा प्रवास – माझ्या धावण्याची गोष्ट
नागपूरच्या रस्त्यावर मी पहिल्यांदा धावायला निघालो होतो. उद्देश साधा — शरीरयष्टी नीट ठेवायची. पण तेव्हा धावण्यामागचं विज्ञान माहित नव्हतं. शूज कसे असावेत, वॉर्म-अप का करायचा, श्वास कसा घ्यायचा — काहीच माहिती नव्हतं.
फक्त धावायचं… आणि दम लागेपर्यंत धावायचं.
२ किलोमीटरनंतर पाय जड व्हायचे, श्वास जोरात चालायचा. तरीही कुठेतरी मनात आनंद असायचा — “मी हे केलं!”
वर्षं सरली. धावणं अधून-मधून सुरूच राहिलं, पण त्यात सातत्य नव्हतं.
२०१९ मध्ये आयुष्याने मला पुण्यात आणलं. इथे येऊन माझी भेट झाली काही उत्साही, अनुभवी धावपटूंशी. त्यांचं बोलणं, त्यांची तयारी, त्यांचा शिस्तबद्ध दृष्टिकोन — हे सगळं बघून माझी विचारसरणी बदलली. तेव्हा उमजलं — धावणं म्हणजे फक्त पाय हलवणं नाही; ते एक शास्त्र आहे, एक प्रवास आहे, एक जीवनशैली आहे.
मी हळूहळू शास्त्रीय दृष्टिकोन आत्मसात करू लागलो.
आहारात ८०-२० पद्धत — ८०% हेल्दी, २०% आवडीचं.
योग्य शूज, योग्य फूट-होल्ड, स्ट्रेचिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग, एंड्युरन्स ट्रेनिंग — हे सगळं माझ्या रुटीनचा भाग बनलं.
शरीर हळूहळू बदलत गेलं… आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे, माझी मनःस्थिती बदलली.
पण प्रवासात आव्हानं आलीच.
उजव्या घोट्याला लागलेली दुखापत काही महिन्यांनी परत यायची. वेळेचा अभाव, कधी स्वतःवरचा अविश्वास — “मी खरंच करू शकतो का?” असा प्रश्न मनाला टोचायचा.
पण जेव्हा सहधावपटूंच्या कथा ऐकल्या, लोक कशा वैज्ञानिक पद्धतीने AI वापरून तयारी करतात ते पाहिलं, तेव्हा मनात एकच विचार आला — “मी मागे का राहू?”
२०२५ माझ्यासाठी खास ठरलं.
१० किमी धावणं आता सहज शक्य झालं, आणि अलीकडेच २१ किमी हाफ मॅरेथॉन चांगल्या गतीने पूर्ण केली. कुणाशी स्पर्धा नाही, कुठलंच बक्षीस नाही — फक्त कालच्या स्वतःपेक्षा आज चांगलं करणं हेच माझं उद्दिष्ट.
धावण्याने मला शिकवलं —
खेळ जिंकायचा असेल तर मैदान सोडू नका.
सातत्य, मेहनत आणि विश्वास — हाच विजयाचा मंत्र.
आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत लढत राहिलात, तर यश तुमचंच असतं.
कधी कधी व्यवसायात किंवा वैयक्तिक आयुष्यात कठीण प्रसंग आले, तेव्हा मी धावणं निवडलं.
रस्त्यावरचे ते पाऊल टाकताना मला जाणवायचं — “मी अजूनही खेळात आहे.”
धावणं मला फक्त फिटनेस देत नाही, तर लढण्याची ऊर्जा आणि मनाचा धीर देते.
आज माझं पुढचं ध्येय ठरलेलं नाही. पण माझ्या स्वभावात एक गोष्ट आहे — मी मैदान कधीच सोडत नाही.
कदाचित उद्या फुल मॅरेथॉन असेल, परवा अल्ट्रा मॅरेथॉन… पण जे काही ठरवेन, ते पूर्ण करेन.
शेवटी एवढंच —
वय हा फक्त आकडा आहे.
तुमची आवड, तुमचं सातत्य आणि तुमची जिद्द — ह्याच तुमच्या खरी ताकद आहेत.
जर तुम्हीही आयुष्यात काहीतरी बदलू इच्छित असाल, तर आजच पहिला पाऊल उचला.
कदाचित हाच तुमच्या नव्या प्रवासाचा पहिला दिवस असेल…

टिप्पण्या