रविवार मंजे आठवडाभर कामाच्या पाट्या टाकल्यानंतर येणारा आळसावलेला दिवस ,ह्या दिवसाची सुरवात नेहमीपेक्षा जर वेगळीच होते मागील रविवारी अचानक आतेभावाचा फोन आला तो त्याच्या कडील नवसाचे आमंत्रण देण्यासाठी. मी पण रविवारची सुट्टी असल्यामुळे काहीही आढेवेढे न घेता तयार झालो .मजल दरमजल करत एकदाचा नवसाच्या ठिकाणी पोहचलो .तिथे गेल्यानंतर तिथले दृश्य पाहून मन अगदी विष्णन झाले ,एकीकडे देवाची पूजा सुरु होती दुसरीकडे कापलेला बोकड सोलणे सुरु होते तर तिसरीकडे जुगाराचा डाव अगदी रंगात आला होता.देवस्थानच्या विस्तीर्ण परिसरात हाडांचा खच,कोबड्यांचे पंख विखुरलेले होते ,बळी दिलेल्या बोकडांचे पाय चिंचेच्या झाडाला लटकत होते निरनिराळ्या झाडाला भक्तांनी मुलांच्या आशेने अर्पण केलेले छोटे पाळणे लटकत होते ,काही वयस्क पुरुष पिण्याच्या कामी लागले होते. ते मद्यपान आणि जुगार इतक्या इर्षेने करत होते कि ते फक्त तेवढ्या साठीच तिथे आल्याचा भास निर्माण होत होता .
असल्या परिस्थितीत कसला नवस अन कसलं काय ? मला तर ति फक्त संडे-पार्टीच वाटली.
कोणत्याही प्रश्नाची कारणमीमांसा न करता आपण कोणत्यातरी देवाला नवस बोलतो ,आणि ऐपत असो व नसो तो फेडण्यासाठी कर्जबाजारी होतो.माझ्या मते देव हा जर सृष्टीचा पिता आणि पालनकर्ता असेल तर त्याचीच संतती मंजे आपण कापलेला बोकडाच्या रक्ताने खुश कसा काय होणार??एकविसाव्या शतकातही आपण पार या अंधश्रद्धाच्या नादी लागलेलो आहोत .साढे तीनशे वर्षा पहिले तुकाराम महाराज सांगून गेले कि
शेंदूर फासून दगडासी
नवस बोलते तयासी
नवस-सायासे पोरे होती
तर का करणे लागते पती .
पण आपण दैववाद आणि चंगळवाद यांची सरमिसळ करून टाकली आहे,आणि काहीही तर्कसंगत विचार न करता अंधश्रद्धाच्या नादी लागलेलो आहोत
माझ्या मते भारताला सुपरपावर बनवायचा असेल तर आपल्याला नवीन पिढी हि विज्ञाननिष्ठ आणि तर्कसंगत विचार करणारी घडवावी लागेल पण आज आपल्या समाजात हो परिस्थिती फार धुसर होते आहे. काही लोकं त्यांना येणाऱ्या समस्यांची उकल न करता दैववाद आणि आशावाद यांच्या मागे लागले आहेत .हि परिस्थिती सुधारणे समाजाच्या हितासाठी जरुरी आहे .
नाहीतर शेवटी काय ;
शेळी जाते जीवानिशी
अन खाणारे मनतात
मऊ कशी लागेना .
ह्या सर्व विचार मंथना नंतर उरते काय तर ,
प्रश्न आणि प्रश्न ??
-:लेखक (सचिन गवते)