सत्तांतर

सत्तेसाठी होणार्‍या एका वेगळ्याच संघर्षाची कहाणी





काळाप्रमाणेच संघर्षही सतत वाहतच असतो. त्याला खंड असा नसतोच. असलीच, तर भरती असते, पूर असतो. जेव्हा जेव्हा खाणारी तोंडं भरमसाट वाढतात, गर्दी होते. तेव्हा तेव्हा संघर्ष बळावून उठतो. जेव्हा उपलब्ध अन्नात, भूमीत वाटेकरी निर्माण होतात, तेव्हा संघर्ष उचल खातो. जेव्हा अस्थिरता निर्माण होते, एखादी जात धोक्यात येते, बाहेरून परकं कोणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं. तेव्हा संघर्ष उतू जातो.

ज्यांना बोलता येतं, ते हा राग, उद्दामपणा, संघर्ष शब्दांतून दाखवतात. ज्यांना बोलता येत नाही, त्यांचे राग-लोभ प्रेम हावभावांतून, स्पर्शातूनच सांगितले जातात.

संघर्ष पेटला, की शस्त्रास्त्रं वापरली जातात ज्याना शस्त्रास्त्र माहीतच नसतात, ते सुळे, नख वापरतात. संघर्ष सर्वत्र भरून राहिलेला असतो.