विरह व्याकूळ

एकदा काय झालं,
एक सरिता रागवली
आपल्या boyfriend ला म्हणाली

' हे रे काय सागर !
मीच का म्हणून ?

दर वेळी मीच का
मीच का यायचं खाली डोंगरावरून ?
आणायचं रानावनातलं सारं तुझ्यासाठी
दरी बघायची नाही
कडा बघायचा नाही
कशी सुसाट पळत येते मी
विरहव्याकुळ , संगमोत्सुक
कधी एकदा तुला गच्च मिठी मारीन
तुझ्यात हरवून , हरपून जाईन

आणि तू वेडा
तुझं लक्षच नसतं कधी
सारखा त्या चंद्रिकेकडे टक लावून असतोस.
उसळतोस तिच्यासाठी
तुझ्यासाठी पाणी आणते मी
पण तुला भरती येते तिच्यासाठी

मी नाही जा !
बोलणारच नाही आता.
येणारही नाही.
काठावरच्या लोकांना सांगून
मोट्ठं धरण बांधीन
थांबून राहीन तिथेच.
बघच मग.

सरिताच ती
बोलल्याप्रमाणे वागली.
सागर बिचारा तडफ़डला
आकसला , आतल्या आत झुरत गेला.
शेवटी फ़ुट्ला बांध त्याच्याही संयमाचा
उठला ताड
ओरडला दहाड
उफ़ाळला वारा पिऊन
लाटांचं तांड्व घेऊन
सुटला सुसाट
सरितेच्या दिशेने...

लोक येडे.
म्हणाले 'सुनामी आली ! सुनामी आली


सचिन गवते