शीर्षक वाचून
दचकलात ना ,पण ह्या शीर्षकाला साजेसचं नुकतचं हरियाना या
राज्यात घडलेलं आहे.पुन्हा एक अध्यात्मिक बाबा आपल्या सर्व लवाजम्या सोबत तुरुंगात
गेला आहे,का तर एका खुनाच्या खटल्या संधर्भात न्यायालयाने
त्याच्यावर अजामीनपात्र वाँरंट बजावला, पण त्याच्या तथाकथित
भक्तांनी त्याच्या भोवती सुरक्षेचे कडे करून पोलिसांना
दोन ते तीन दिवस त्याच्या जवळ सुद्धा फिरकू दिले नाही.संत रामपाल हा आपल्या मस्तीत
इतका बुडाला होता कि आपल्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो याची किंचित हि
भीती त्याला वाटत नव्हती .त्याच्या जवळ स्वताची अनधिकृत सशस्त्र सेना होती. या
मग्रुरी चे काय कारण असू शकते. त्याच्या जवळ
असलेली अमाप सत्ता संपती,दैवी गुण,त्याचे स्वघोषित अवतार
असणे कि आणखी काही ?
वरील
प्रश्नाचे उत्तर काय असू शकते.रामपाल बाबाची मुजोरी वाढण्यामागे कारण त्याचे
अंधविश्वासू भक्त जे
कशाचाही विचार न करता त्याच्या एका शब्दावर जीवावर उदार होतात,जीव देण्याकरिता तयार होतात
.पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब आणि गोळ्यांचा वर्षाव करतात .या भक्तांच्या जोरावरच हे
बाबा लोक समाजात इतकी अनागोंदी पसरवु शकतात. मग तो बलात्कार असो किंव्हा
कोणाचा खून असो ह्यांना कशाचीही भीती नसते .हा रामपाल बाबा सरकारी उपअभियंता होता
आणि सन २००० मध्ये सरकारने त्याला नौकरीत कामचुकारपणा केल्यामुळे काढून टाकले
.नंतर त्याला एका एकी आपण देव असल्याचा साक्षात्कार झाला.
२००० ते
२०१४ या कारकिर्दीत त्याचे जवळ पास २५ लाख भक्त बनलेत .त्याच्या प्रवचनाने भुलून
त्याच्याकडे आकर्षिले गेले. आजघडीला त्याच्याकडे बीमडब्लू ,मर्सिडीज
सारख्या महागड्या कार्स आहेत.हरियाना येथे त्याचा १२ एकरात अलिशान आश्रम आहे .हे
सारे ऐश्वर्य रामपाल बाबा ने एका दशकात निर्माण कलेले आहे .रामपाल प्रमाणेच एक
महान संत सध्या बलात्काराच्या आरोपात एका वर्षा पासून राजस्थान येथील तुरुंगात आहे
तरीही त्याचा भक्तांच्या संखेत लक्षणीय अशी घट दिसून आली नाही .उलट या बाबाचे हे उद्दाम भक्त
गुरुपौर्णिमेला तुरुंगाच्या बाहेर त्याच्या साठी
दिव्यांची आरास करतात. टीव्ही चॅनेल वर त्याच्या साठी वाद घालायला तयार होतात .
मला एक
प्रश्नाचे उत्तर सापडत नाही ;कि आपला समाज आज
बऱ्यापैकी शिक्षित आहे, तरीही आपण या बुवांच्या नादी का
लागतो ?
का आपल्या
दुखांची दाद यांच्या कडे मागतो .
मंगेश पाडगावकर याचं फार
सुंदर विवेचन आपल्या कवितेद्वारे
करतात. ते म्हणतात
“माणसे
खपाट खंगलेली,आतून
आतून भंगलेली
अदृश्य दहशतीने तंगलेली,आधार हवा.
येथे हवा
कोणी जबरी बुवा,जो काडील
साऱ्या उवा
मनातल्या चिंतांच्या”
आज आपल्या समाजात आपण बघितले तर जवळपास सर्व बाबा हे उच्च विद्याविभूषित
आहेत .काही बाबा तर इंग्रजीतून प्रवचन करतात. ह्या सर्व बाबांनी समाजमन बरोबर ओळखलेले आहे.
धकाधकीच्या आयुष्यात शरीराची,मनाची होणारी तगमग,लोकांच्या गरजा, काहीतरी अपूर्ण असल्याची लोकांची
भावना यांचा पूर्ण अभ्यासाअंती यांन्ही आपले दुकान
थाटले आहे . या टीव्ही छाप बाबा लोकांना बरोबर माहित आहे कि ह्या डोके गमावलेल्या
लोकांकडून आपला स्वार्थ कसा साधायचा.त्यामुळेच काही बाबा समोश्या सोबत हिरवी चटणी
खाण्यास सांगतात ,ताबीज घालायला सांगतात त्या बद्दल दशवन ची
मागणी करतात. (दशवन म्हणजे पगाराचा दहावा हिस्सा) कोणी मनशांती साठी योग सांगतात ,कोणी जगण्याची कला शिकवण्याचाच ध्यास घेतात आणि यावर कडी मनून कि काय काही
बाबा संभोगातून समाधीकडे नेण्याच्या गोष्टी करतात .पुण्या सारख्या ठिकाणी अलिशान
आश्रम उभारतात.
या बाबा लोकांचा खास भक्त समुदाय असतो. बुवा-बाबा चे पाईक (स्थाईक) झालेले
भक्त मग दुसऱ्या लोकांना पंथात ओढण्याच्या कामाला लागतात ; त्यासाठी आकाश पातळ एक करतात(साम-दाम-दंड-भेद वापरतात) आणि
हा धंधा असाच अविरत चालू राहतो .भक्तांची संख्या रोज वाढत जाते. पैसा भरमसाठ येत
राहतो आणि पैसाबरोबर येते मग्रुरी, सामंतशाही,एकाधिकारशाही आणि सरतेशेवटी हे सर्व बाबा आपले पंथ एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी
याप्रमाणे चालवतात टीव्ही, सोशल
मिडिया यावर यांची पध्दतशीर मार्केटिंग केली जाते आणि हे असतात त्या कंपनी चे
अनभिषिक्त सम्राट आणि सीईओ .
ह्या
सीईओ चा पावर जसा जसा जसा वाढत जातो त्याप्रमाणे हे स्वतला मग देवाचे अवतार
घोषित करतात .मग साई बाबा ,शंकर ,विष्णू हे साक्षात पृथ्वी
तलावर यांच्या रूपाने वावरत असतात. भक्तांची कमी नसतेच, मग काय सप्त तारांकित सेवा
हजर असतातच .सारे ऐशोआराम यांच्या पायाशी लोळण घेत असतात .
सध्या
ज्या रामपालला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याच्या आश्रमाच्या झडतीत पोलिसांना
बंदुकीच्या गोळ्या ,पेट्रोल
बॉम्ब ,अश्लील
सीडीज, लेडीज
बाथरूम मध्ये बसवलेले सीसी टीव्ही कॅमेरे सापडलेले आहेत.त्याच्या भक्तांनी
पोलिसांवर केलेला हल्ला हा भारतीय लोकशाहीवर केलेला हल्ला आहे.आता हरियाना सरकार
हा हल्ला कश्या प्रकारे घेते हे पाहणे रंजक ठरणार आहे . हा रामपाल बाबा स्वताला
कबीराचा अवतार मानत होता. आणि त्या अवताराच्या जोरावरच त्याची माया गोळा करणे सुरु
होते .
हे सर्व
होऊनही आमची डोकी ठिकाणावर
येणार आहेत का ? हा
प्रश्न माझा मलाच पडला आहे .
पुन्हा
आपण एकाद्या नवीन बुवाच्या नादी लागून आपल्या आयुष्याचे मातेरे करून घेणार आहोत का? आपणा सर्वांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे .ह्या संधी साधूंना वेळीच धडा
शिकवायला हवा. तरच आपलं होणार नुकसान आपण टाळू शकू आणि खऱ्या दृष्टीने आपला समाज
प्रगतीपथावर नेऊ शकू. स्वच्छ भारत मोहिमेत या बुवा बाजीला आपल्याला स्वच्छ करायलाच हवं.
सचिन गवते