बुवाबाजी : प्रायव्हेट लिमिटेड


शीर्षक वाचून दचकलात ना ,पण ह्या शीर्षकाला साजेसचं  नुकतचं हरियाना या राज्यात घडलेलं आहे.पुन्हा एक अध्यात्मिक बाबा आपल्या सर्व लवाजम्या सोबत तुरुंगात गेला आहे,का तर एका खुनाच्या खटल्या संधर्भात न्यायालयाने त्याच्यावर अजामीनपात्र वाँरंट बजावला, पण त्याच्या तथाकथित भक्तांनी त्याच्या भोवती सुरक्षेचे कडे करून  पोलिसांना दोन ते तीन दिवस त्याच्या जवळ सुद्धा फिरकू दिले नाही.संत रामपाल हा आपल्या मस्तीत इतका बुडाला होता कि आपल्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो याची किंचित हि भीती त्याला वाटत नव्हती .त्याच्या जवळ स्वताची अनधिकृत सशस्त्र सेना होती. या मग्रुरी चे काय कारण असू शकते. त्याच्या जवळ असलेली अमाप सत्ता संपती,दैवी गुण,त्याचे स्वघोषित अवतार असणे कि आणखी काही ?
वरील प्रश्नाचे उत्तर काय असू शकते.रामपाल बाबाची मुजोरी वाढण्यामागे कारण त्याचे अंधविश्वासू  भक्त जे कशाचाही विचार न करता त्याच्या एका शब्दावर जीवावर उदार होतात,जीव देण्याकरिता तयार होतात .पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब आणि गोळ्यांचा वर्षाव करतात .या भक्तांच्या जोरावरच हे बाबा लोक समाजात इतकी अनागोंदी पसरवु शकतात. मग तो बलात्कार असो  किंव्हा कोणाचा खून असो ह्यांना कशाचीही भीती नसते .हा रामपाल बाबा सरकारी उपअभियंता होता आणि सन २००० मध्ये सरकारने त्याला नौकरीत कामचुकारपणा केल्यामुळे काढून टाकले .नंतर त्याला एका एकी आपण देव असल्याचा साक्षात्कार झाला.
२००० ते २०१४ या कारकिर्दीत त्याचे जवळ पास २५  लाख भक्त बनलेत .त्याच्या प्रवचनाने भुलून त्याच्याकडे आकर्षिले गेले. आजघडीला त्याच्याकडे बीमडब्लू ,मर्सिडीज सारख्या महागड्या कार्स आहेत.हरियाना येथे त्याचा १२ एकरात अलिशान आश्रम आहे .हे सारे ऐश्वर्य रामपाल बाबा ने एका दशकात निर्माण कलेले आहे .रामपाल प्रमाणेच एक महान संत सध्या बलात्काराच्या आरोपात एका वर्षा पासून राजस्थान येथील तुरुंगात आहे तरीही त्याचा भक्तांच्या संखेत लक्षणीय अशी  घट  दिसून आली नाही .उलट या बाबाचे हे उद्दाम भक्त गुरुपौर्णिमेला  तुरुंगाच्या  बाहेर त्याच्या साठी दिव्यांची आरास करतात. टीव्ही चॅनेल वर त्याच्या साठी वाद घालायला तयार होतात .
मला एक प्रश्नाचे उत्तर सापडत नाही ;कि आपला समाज आज बऱ्यापैकी शिक्षित आहे, तरीही आपण या बुवांच्या नादी का लागतो ?
का आपल्या दुखांची दाद यांच्या कडे मागतो .

मंगेश पाडगावकर याचं फार सुंदर विवेचन आपल्या कवितेद्वारे करतात. ते म्हणतात
                  “माणसे खपाट खंगलेली,आतून आतून भंगलेली
                      अदृश्य दहशतीने तंगलेली,आधार हवा.
                  येथे हवा कोणी जबरी बुवा,जो काडील साऱ्या उवा
                             मनातल्या चिंतांच्या
आज आपल्या समाजात आपण बघितले तर जवळपास सर्व बाबा हे उच्च विद्याविभूषित आहेत .काही बाबा तर इंग्रजीतून प्रवचन करतात.  ह्या सर्व बाबांनी समाजमन बरोबर ओळखलेले आहे. धकाधकीच्या आयुष्यात शरीराची,मनाची होणारी तगमग,लोकांच्या गरजा, काहीतरी अपूर्ण असल्याची लोकांची भावना यांचा पूर्ण  अभ्यासाअंती यांन्ही आपले दुकान थाटले आहे . या टीव्ही छाप बाबा लोकांना बरोबर माहित आहे कि ह्या डोके गमावलेल्या लोकांकडून आपला स्वार्थ कसा साधायचा.त्यामुळेच काही बाबा समोश्या सोबत हिरवी चटणी खाण्यास सांगतात ,ताबीज घालायला सांगतात त्या बद्दल दशवन ची मागणी करतात. (दशवन म्हणजे पगाराचा दहावा हिस्सा) कोणी मनशांती साठी योग सांगतात ,कोणी जगण्याची कला शिकवण्याचाच ध्यास घेतात आणि यावर कडी मनून कि काय काही बाबा संभोगातून समाधीकडे नेण्याच्या गोष्टी करतात .पुण्या सारख्या ठिकाणी अलिशान आश्रम उभारतात.
या बाबा लोकांचा खास भक्त समुदाय असतो. बुवा-बाबा चे पाईक (स्थाईक) झालेले भक्त मग दुसऱ्या लोकांना पंथात ओढण्याच्या कामाला लागतात ; त्यासाठी आकाश पातळ एक करतात(साम-दाम-दंड-भेद वापरतात) आणि हा धंधा असाच अविरत चालू राहतो .भक्तांची संख्या रोज वाढत जाते. पैसा भरमसाठ येत राहतो आणि पैसाबरोबर येते मग्रुरी, सामंतशाही,एकाधिकारशाही आणि सरतेशेवटी हे सर्व बाबा आपले पंथ एक  प्रायव्हेट लिमिटेड कंपनी याप्रमाणे चालवतात टीव्ही, सोशल मिडिया यावर यांची पध्दतशीर मार्केटिंग केली जाते आणि हे असतात त्या कंपनी चे अनभिषिक्त सम्राट आणि सीईओ .
ह्या  सीईओ चा पावर जसा जसा जसा वाढत जातो त्याप्रमाणे हे स्वतला मग देवाचे अवतार घोषित करतात .मग साई बाबा ,शंकर ,विष्णू हे साक्षात पृथ्वी तलावर यांच्या रूपाने वावरत असतात. भक्तांची कमी नसतेच, मग काय सप्त तारांकित सेवा हजर असतातच .सारे ऐशोआराम यांच्या पायाशी लोळण घेत असतात .
सध्या ज्या रामपालला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याच्या आश्रमाच्या झडतीत पोलिसांना बंदुकीच्या गोळ्या ,पेट्रोल बॉम्ब ,अश्लील सीडीज, लेडीज बाथरूम मध्ये बसवलेले सीसी टीव्ही कॅमेरे सापडलेले आहेत.त्याच्या भक्तांनी पोलिसांवर केलेला हल्ला हा भारतीय लोकशाहीवर केलेला हल्ला आहे.आता हरियाना सरकार हा हल्ला कश्या प्रकारे घेते हे पाहणे रंजक ठरणार आहे . हा रामपाल बाबा स्वताला कबीराचा अवतार मानत होता. आणि त्या अवताराच्या जोरावरच त्याची माया गोळा करणे सुरु होते .
   हे सर्व होऊनही आमची डोकी ठिकाणावर  येणार आहेत का ? हा प्रश्न माझा मलाच पडला आहे .
पुन्हा आपण एकाद्या नवीन बुवाच्या नादी लागून आपल्या आयुष्याचे मातेरे करून घेणार आहोत का? आपणा सर्वांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे .ह्या संधी साधूंना वेळीच धडा शिकवायला हवा. तरच आपलं होणार नुकसान आपण टाळू शकू आणि खऱ्या दृष्टीने आपला समाज प्रगतीपथावर नेऊ शकू. स्वच्छ भारत मोहिमेत या बुवा बाजीला आपल्याला  स्वच्छ करायलाच हवं.
तरच आपला देश स्वच्छ भारत सुंदर भारत ”  बनेल.

सचिन गवते 


तंत्रज्ञानाचा ओवरलोड


अति तिथे मातीया मनी प्रमाणे आज आपण सभोवताली जे चित्र पाहतो ते एकदम विदारक आहे. आजकाल घरी, रस्त्यावर, शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस, हॉटेल्स, मल्टीप्लेक्स  इत्यादी ठिकाणी लोकं सतत काही तरी आपल्या मोबाईल वर टाईप करत असतात किंवा च्याट करत असतात किंवा फेसबुक, व्हाटसअॅप किंवा ऑनलाइन अथवा ऑफलाइन गेम खेळण्यात मग्न असतात. सर्व जन या आभासी जगात इतके मग्न झालेले असतात कि खऱ्या जगाचा विसर पडावा. वयोगट १२ ते २० तर या व्यसनांनी पूर्ण जखडून टाकला आहे. फेसबुक, व्हाटसअॅप  आणि इतर तत्सम वेबसाईटस याचं तरुणांना प्रचंड वेड लागलंय. सोशल नेटवर्किंग ने तर भारतात कहरच केला आहे. या धोक्यांसंदर्भात सगळीकडे मोठया उत्साहात बोललं जात, पण काही अपवाद वगळता कोणावरही त्याचा फरक पडत नाही. आज स्थिती अशी आहे की व्यसन मुक्ती संस्थाना दारू, अमली पदार्थ, सीगारेट याच्या जोडीने या विषयांवर काम करणे जरुरीचे होऊन बसले आहे या सर्वांना व्यसनांच्या पातळीवर आणण्याचे काही कारणं आहेत, त्याचाच आपण पुढे उहापोह करूया. आपल्याला सतत मोबईलची बटनं दाबायची सवय असते. फेसबुकवर कुणी काही अपलोड केलं काय, व्हाटसअॅपवर काही मेसेज आहे का, काही इमेल अॅलर्टस आहे का हे सतत आपण तपासत असतो. जर आपण काही कमेंट केलं आणि त्याला काहीक्षण प्रतिसाद मिळाला नाही तर, एक अस्वस्थता आपल्याला नकळत यायला लागते आणि पराकोटीचे चित्र म्हणजे प्रत्येकजण आपला मोबाईल रात्री झोपतांना स्वतःच्या उशाजवळ ठेवत असतो आणि उठल्याबरोबर मोबाईल बघितल्याशिवाय कोणत्याही कामाची सुरुवात करत नाही, काहींना इंटरनेट आणि गुगलच इतकं खूळ असत की ते काही वेळ बंद पडलं की एकदम अस्वस्थ व्हायला होते.

            
आजकाल शाळेमध्ये सुद्धा मुलांना कॉम्पुटर, मोबाईल, इंटरनेट या बद्दल माहिती दिली जाते आणि त्याचा वापराबद्दल प्रशिक्षण दिलं जातं. आजकाल शाळकरी मुलांना काही प्रोजेक्टस संबंधी माहिती हवी असल्यास बिनदिक्कत गुगलवर जाऊन माहिती शोधण्यात काहीहि गैर वाटत नाही आणि नेमकी गोष्ट  म्हणजे पालकं आणि शिक्षक त्यांना यासाठी प्रोत्साहित करतात. या गोष्टीत काही गैर आहे असही नाही, पण छोट्या मोठया प्रश्नांची उत्तरे स्वतःन सोडवता, त्यांच्या बुद्धीला चालना देता प्रत्येक वेळी गुगलची मदत घेणे हे चुकीचे आहे. यामुळे आपली येणारी पिढी निर्बुद्ध बनत चालली आहे. निर्णय घेण्याची क्षमता कमी होत आहे, मुलांची बुद्धी लोप पावत आहे कारण प्रत्येकाला माहीत आहे की जर काही प्रश्न पडले तर सरळ गुगल वर जायचं आणि एका क्लिक सरशी उत्तर मिळवायच.निकोलस कार या अमेरिकन संशोधकाचा एक लेख नुकताच वाचनात आला. अटलांटीस मासिकात प्रसिद्ध झालेल्या त्या लेखाच नावचं मोठ जबरदस्त होत Is Google Making Us Stupid” थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यामध्ये निकोलस कार म्हणतो की, एकाचवेळी आपण अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला मल्टीटास्किंग असं गोंडस नावं देतो. मल्टीटास्किंग करणाऱ्याला आपल्या समाजात मानमरातब आहे. पण निकालोस कारच्या मते हे सर्व थोतांड आहे, आपला मेंदू एकावेळी फक्त एकच काम चांगल्या प्रकारे करू शकतो. इंटरनेट, फेसबुक, व्हाटसअॅप, मोबाईल आणि सर्व नवी गॅजेटस यांच्या अति वापरामुळे आपल्या मेंदूला घातक सवयी लागतात आणि हे सर्व परिणाम नकळत आपल्या शरीरावर, मनावर आणि एकंदरीतच आपल्या व्यक्तीमत्वावर होत असतात. याचबरोबर आपल व्यक्तिमत्व उथळ, सैरभेर, आणि कशातच रस नसलेलं अरसिक होऊन जात. आज निकोलस कार ने सांगितलेले परिणाम कमी अधिक प्रमाणात आपल्या अवती भवती आपण बघतच आहोत. छोट्या मोठया कारणांसाठी हिंसक होणारी मुले प्रसंगी आत्महत्या करायला ही मागेपुढे पाहत नाहीत.

          
ही सर्व साधनं आपल्या सोयीसाठी आहेत यामुळे आपल संभाषण तीव्र गतीनी होईल आणि बाकी वेळ आपल्याला आपलं आयुष्य शांतपणे जगता येईल ही अपेक्षा होती. पण झालं उलट, आपण या साधनांचा वापर करण्यापेक्षा त्यांनीच आपला ताबा घेतलाय, एकंदरीत आपल्याला वेडं करून सोडलंय. आता आपण इंटरनेट वापरण्याच्या काही सवयी बद्दल बोलूया. समजा काही महत्वाच्या कामा निमीत्य आपण इंटरनेट सुरु करतो, जी माहिती आपल्याला हवी असेल ती गुगल आपल्याकरिता शोधून देते. त्याच बरोबर वेगवेगळे पर्याय पण आपल्याला गुगल तर्फे दाखवल्या जातात आणि आपण त्या हायपर लिंक्समार्फत कुठल्याकुठे वाहवत जातो हे आपले आपल्याला ही कळत नाही. कधी कधी तर आपण कोणती माहिती शोधत होतो हे सुद्धा साफ विसरून जातो. जर आपण मह्त प्रयासाने काही वाचण्याचा प्रयास केला तरी ते आपल्या मेंदूमधील वर्किंग मेमरी मध्ये काही क्षण राहते आणि नष्ट होऊन जाते. ती माहिती कितीही  प्रयास केला तरी आपल्या दीर्घ स्मृती पर्यंत पोहचतच नाही कारण प्रत्येक वेब पेज वर हायपर लिंक्स चा जाळचं असत जे आपल्याला दिशाहीन करायला पुरेसे असतात. त्यामुळे इंटरनेट वरून अभ्यासाच्या वेळेस आपली स्थितीएक धड भाराभर चिंध्याअशी होऊन जाते. एकाच गोष्टीवर लक्ष्य केंद्रित केल्यामुळे आपल्या मेंदूला काहीच लक्ष्यात राहत नाही. आपण सदैव इंटरनेट वर पडीक असल्या मुळे वारंवार वेबपेजेस बदलण्याची आपल्याला सवयच लागते. ही सवय आपल्या मेंदूचा वर्किंग  पॅटर्न होऊन जातो. मग हाच धरसोड वृतीचा पॅटर्न आपण प्रत्येक ठिकाणी वापरण्याचा प्रयास करतो आणि तो जर तसा काम करत नसेल तर चीड, अस्वस्थता मग हा आपल्या स्वभावाचाच भाग होऊन जातो आणि हे सर्व वारंवार घडत असेल तर व्यक्ती निराशेच्या गर्तेत फेकल्या जाऊ शकतो. या सर्व गोष्टींमुळे जगात भरपूर आत्महत्या सुद्धा झाल्या आहेत.
            काही सोशल नेटवर्किंग साईट तर बहुधा याच साठी जन्माला आल्या आहेत.सर्वात पहिले मायस्पेस होत नंतर ऑर्कुट आलं त्यानंतर फेसबुक नं ऑनलाईन जग ताब्यात घेतलं. आजकाल व्हाटसअॅप या ऑनलाईन अप्लिकेशन नं तरुणांचा ताबा घेतलाय. फेसबुक वर चिल्लर गोष्टीसाठी अपडेट देणारे पण आहेत. उदाहरणार्थ मी काय ऐकतोय, काय पहातोय, काय खातोय इथपासून तर कोणते कपडे घातले आहेत आणि कोणते कपडे घातले नाहीत, बस ने प्रवास करत आहो, सायकल चालवत आहो इथपर्यंत लोकं चर्चा करतांना आढळतात. मग त्यावर कमेंट्स त्या कमेंट्स वर कमेंट्स हा उद्योग निरंतर सुरूच राहतो. बरं यामधुन काही विधायक कधीच बाहेर पडत नाही. फक्त वाढते तर चीडचीड, राग, असूया, लोभ, मत्सर. समजा एखाद्या व्यक्तीने आपल्या नवीन कारचा फोटो अपलोड केला तर तोंडदेखलं त्याचे मित्र त्या पोस्टला लाईक तर करतात पण कुठेतरी मनात असूया, मत्सर निर्माण होतोच. त्या मित्राजवळ तीचं कार आहे मग माझ्याजवळ का नाही. ह्या प्रश्नांना कधीही अंत नसतो कारण प्रत्येक दिवशी कोणीतरी काहीतरी घेणारच किंवा काहीतरी नवीन करणारंच आणि आपण प्रत्येक वेळेस असं वागलो तर त्याचा त्रास आपल्यालाच होतो. या सर्वांचा परिणाम म्हणजे व्यक्तिमत्व दुभंगु शकते आणि स्वतःसोबत काहीही वाईट झालेलं नसतांना सुध्दा एक अपराधीपणाची भावना मनात जन्म घेते. फेसबुक सारख्या साईट वर सतत कोणीतरी काहीतरी पोस्ट करतच असत. उदाहरणार्थ आपल्याविषयची माहिती, आपले फोटोज, आपण कुठे फिरायला गेलो होतो ते फोटोज, टीव्ही किंवा इंटरनेट वर काय बघितले याच तपशील हे सतत अपडेट होत असतं आणि आपण हे सर्व केलं नाही तर आपण ह्या कनेक्टेड जनरेशन मधुन बाहेर फेकलो जाऊ ही भीती असते आणि या सर्व कारणांमुळे बनत असलेल्या इमेजमुळे सुध्दा व्यक्ती संभ्रमात असतो. पैसे घेऊन इमेज बिल्डींग करून देणारे सुद्धा आजकाल खूप झालेत म्हणुनच फेसबुक म्हणा किंवा इंटरनेट,मोबाईल यांच्या अतिवापरामुळे विचारशक्ती खंडित होते कारण इंटरनेट या साधनाची रचनाच तशी आहे. ही खंडित विचारशक्ती आयुष्यातील कोणताही गहन प्रश्न सोडवण्याच्या कामाची नसते.

           

या सर्व घडामोडींचा परिणाम लहान मुलांवर, वयोगट ते १५ यांचावर भयंकर होतो. या लहान वयात त्यांचा मेंदुवर हा धरसोड वृतीचा पॅटर्न इंटरनेटमुळे बिंबवल्या जातो आणि त्यांच्या मेंदूची खरी वाढचं खुंटते; ते नेहमी शोर्टकट शोधायला लागतात . प्रत्येक गोष्टीचीच त्यांना घाई होते. प्रश्न त्यामुळे अजुनच चिघळत जातात, लहान वयातच इंटरनेट आणि तत्सम साधनं हातात आल्यामुळे आणि काय पहायचं याची निर्णय शक्ती नसल्यामुळे ते या गर्तेत आणखी खोल बुडत जातात. काही टीनएजर्स सर्रास    अश्लील साईटसवर पडीक असतात त्यामुळे स्वभावात एक हिंसक छटा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजमीतीला पोर्नइंडस्ट्री कोटीच्या कोटी उडानं घेत आहे ते सर्व वरील कारणांमुळे. शेवटीविकतं म्हणुनच पिकतंहा न्याय इथेसुद्धा लागू आहे . या सर्वांना आपण तंत्रज्ञानाचा ओवरलोड जरूर म्हणु शकतो. एकंदरीत हा माहितीचा अनुस्फोट आहे. याचे परिणाम व्यक्तीच्या स्वभावावर, वागणुकीवर, नितीमत्तेवर पडत आहेत. मोबाईल, इंटरनेट, यांचा अतिवापर टीव्ही आणि त्यावरील तद्दन फालतू मालिका, टुकार गल्लाभरू चित्रपट हे सर्व  इन्फर्मेशन ओवरलोडचे उदाहरणं आहेत. याच्यामुळे काही सामाजिक प्रश्न पण निर्माण होत आहेत.
            ही झाली प्रश्नाची एक बाजु पण ह्याच प्रश्नाला एक दुसरी किनार पण आहे ती म्हणजे -वेस्ट किंवा इलेक्ट्रोनिक कचऱ्याची, दिवसागणिक कंपन्या मोबाईल, कॉम्पुटर आधुनिक उपकरणं यांचे नवनवीन मॉडेल बाजारात आणत असतात. प्रत्येकवेळी नवीन मॉडेल घेतल्यावर जुन्या मॉडेलला कचऱ्यात टाकण्याची तरुणायची फॅशनच आहे. एका .५० ग्रॅम मायक्रोचीपच्या निर्मितीसाठी ६० ते ७० लिटर्स पाणी, १५० ग्रॅम वजनाची घातक रसायनं आणि त्या चीपच्या निर्मितीसाठी लागणारी प्रचंड वीज; सर्व मायक्रोचीपच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या रसायनांचे नाव ऐकले तरी शरीरला घाम घाम फुटेल. ह्या सर्वांमुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होते. कॉम्पुटर, मोबाईल यांच्या अती वापरामुळे कॅन्सर, पक्षघात, ब्रेनस्ट्रोक इत्यादी दुर्धर रोग शरीराला जडू शकतात. आज इंटरनेट या माध्यमामुळे आपल्यासमोर माहितीचा जबरदस्त स्त्रोत उपलब्ध झाला आहे. पण त्याच्या अतिवापरामुळे किंवा चुकीच्या वापरामुळे आपण एका खंडित मनोवृत्ती चे शिकार बनत आहोत. या वृत्तीमुळे आपल्याला काहीतरी शाश्वत करण्यासाठी नेहमीच अडथळे येत आहेत. यावर उपाय म्हणजे कनेक्टेड राहण्याचा हव्यास जर आपण सोडला तर आयुष्यात भरपूर काही करण्यासारखं आहे. गरज आहे ती फक्त छोट्या मोठया गोष्टींमधून आनंद शोधण्याची आणि तसचं आनंदी जगण्याची. हेच सत्य आपल्याला तरुण पिढीला पटवून द्यावे लागेल जे या तंत्रज्ञानाच्या ओवरलोड मध्ये पूर्णत: गुरफटून गेले आहेत; अन्यथा आपलं काय होईल देवच जाणे
 

सचिन गवते